सिन्नर: स्वतःला ‘कॅप्टन’ आणि ज्योतिष म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक उघड होत आहेत. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली सध्या कोठडीत असलेल्या खरातच्या गुन्हेगारी वृत्तीची मुळं चक्क 40 वर्षे जुनी असल्याचे समोर आले आहे. जर त्याकाळीच या प्रवृत्तीला वेळीच ठेचले असते, तर आज अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले नसते.

सुरुवात कशी झाली?
अशोक खरातचा जन्म सिन्नरच्या तांदळवाडीत झाला होता. दहावीत नापास झाल्यावर त्याने शिक्षणाला रामराम ठोकला आणि अहिल्यानगरमधील नातेवाईकांकडे आश्रय घेतला. तिथेच त्याने ‘लक्ष्मण’ या नावाने पहिल्यांदा भोंदूगिरी करण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्याने एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केले. संतापलेल्या गावकऱ्यांनी त्याला बेदम चोप दिला होता, मात्र पोलिसांत तक्रार न झाल्याने तो तिथून पळ काढण्यात यशस्वी ठरला. पुढची 10 ते 15 वर्षे खरात बेपत्ता होता.
‘कॅप्टन’चा अवतार
अशोकनंतर बंगालमध्ये काळी जादू शिकला आणि परदेशातही जाऊन आल्याचा दावा त्याने केला. 1995 मध्ये तो पुन्हा सिन्नरमध्ये गेला. दरम्यान, त्याने राजकीय नेते आणि बड्या अधिकाऱ्यांशी संधान साधून त्याने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आणि भक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण करण्याचे केंद्रच उघडले.
जर 40 वर्षांपूर्वीच त्याच्या पहिल्या गुन्ह्यावर कायदेशीर कारवाई झाली असती, तर त्याच्या भोंदूगिरीचा हा वटवृक्ष इतका फोफावला नसता. अधिकारी आणि राजकीय वरदहस्तामुळे अशा भोंदूंचे मनोबल वाढते, हेच यातून स्पष्ट होते.







