Crime News: जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. वरसाडे तांडा परिसरात विवाहबाह्य संबंधातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या प्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली आहे. विजय भिमा राठोड असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे वय 25 वर्षे होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय हा 24 फेब्रुवारी रोजी रात्री घरातून बाहेर पडला होता, मात्र तो पुन्हा घरी परतलाच नाही. सर्वत्र शोध घेऊनही त्याचा पत्ता न लागल्याने त्याच्या भावाने 26 फेब्रुवारी रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली. संशयावरून पोलिसांनी संजय परशुराम जाधव याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.
संजयने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी सोनाली हिचे विजय राठोडसोबत प्रेमसंबंध होते. विजयकडे काही खाजगी व्हिडिओ होते आणि त्याद्वारे तो सोनालीला वारंवार धमकावत होता. या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून पती-पत्नीने मिळून विजयचा काटा काढण्याचे ठरवले. मात्र, हत्येच्या पद्धतीबाबत आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याबाबत आरोपी सतत आपली विधाने बदलत आहेत. कधी त्यांनी गळा आवळून खून केल्याचे सांगितले, तर कधी लोखंडी हत्याराचा वापर केल्याचे म्हटले आहे. मृतदेह जाळला की जंगलात फेकला, याबाबतही अद्याप स्पष्टता झालेली नाही.
या प्रकरणातील गुंतागुंत पाहता पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी पती संजय जाधव आणि पत्नी सोनाली जाधव या दोघांनाही अटक केली असून पाचोरा न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा या प्रकरणाचा पुढील तपास करत असून मृतदेहाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.






