Shirdi : आखाती देशांमध्ये वाढलेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आता भारतातील दैनंदिन व्यवस्थांवरही दिसू लागला आहे. इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे देशभरात व्यावसायिक एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा परिणाम धार्मिक संस्थांवरही होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर ट्रस्टने प्रसादाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिर हे देशातील सर्वाधिक गर्दी असलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते. महाराष्ट्रासह देशभरातून दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येथे येतात. दर्शनानंतर भाविकांना प्रसाद म्हणून लाडूचे पाकीट दिले जाते. मात्र गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टने हा लाडू प्रसाद सध्या पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गॅसचा साठा मर्यादित असल्यामुळे लाडू तयार करण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या प्रमाणातील इंधनाचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या भाविकांना विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या लाडू प्रसादाचे उत्पादन अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आले आहे.
याशिवाय शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या प्रसादालयातही गॅस बचतीसाठी काही बदल करण्यात आले आहेत. भाविकांसाठी दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या मेन्यूमध्ये बदल करून एक भाजी कमी करण्यात आली आहे. गॅसचा वापर कमी करण्यासाठी कमी इंधन लागणाऱ्या पदार्थांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संस्थान प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणून प्रसादालयात डिझेलवर चालणाऱ्या शेगड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्वयंपाकाची प्रक्रिया सुरू ठेवणे शक्य होणार आहे.
दरम्यान, सध्या भाविकांना देण्यात येणारा बुंदी प्रसाद सुरू असला तरी गॅस टंचाई कायम राहिली तर तोही बंद करण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांवर रामनवमीचा उत्सव येत असून या काळात शिर्डीत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे उपलब्ध गॅस साठा जपून वापरण्यासाठी मंदिर ट्रस्टने हा कठोर निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
देशभरातील इंधन तुटवड्याचा परिणाम आता धार्मिक व्यवस्थांवरही होत असल्याचे या निर्णयातून स्पष्ट होत आहे.







