मुंबई: नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat) आता तपासाची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीची घोषणा केल्याने प्रकरणाला नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे. आतापर्यंत (Nashik News) विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू असताना आता आर्थिक गैरव्यवहारांच्या दिशेनेही तपास होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. (Latest Marathi News)

या प्रकरणात आधीच 12 गुन्हे दाखल झाले असून, विविध तपास यंत्रणा वेगवेगळ्या अंगांनी तपास करत आहेत. मात्र, अलीकडे समोर आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांमुळे आर्थिक गुन्ह्यांची शक्यता अधिक बळावली. याच पार्श्वभूमीवर आता ईडीकडून तपास होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याचा अर्थ केवळ लैंगिक शोषण किंवा फसवणुकीपुरते हे प्रकरण मर्यादित नसून, मोठ्या आर्थिक जाळ्याचाही यात समावेश असू शकतो.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात राजकारण न करण्याचा इशारा देतानाच, खरातच्या कॉल डिटेल रेकॉर्डबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले. तपास यंत्रणांनाच अशा माहितीचा अधिकार असताना ती बाहेर कशी आली, याची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे हा डेटा कसा पोहोचला, याचाही तपास होणार आहे.
या निर्णयामुळे प्रकरणातील इतर संभाव्य आरोपी, सहकारी किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. ईडीचा तपास सुरू झाल्यास मालमत्ता, व्यवहार, बँक खाते आणि संबंधित नेटवर्कची सखोल चौकशी होते, त्यामुळे अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता असते.
एकूणच, या प्रकरणाने केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता प्रशासन, राजकारण आणि आर्थिक व्यवहार यांच्यातील संभाव्य संबंधांवरही प्रश्न निर्माण केले आहेत. पुढील काही दिवसांत या तपासातून मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.







