Suicide News: बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात हुंड्याच्या कारणावरून छळ झाल्याने 20 वर्षीय विवाहितेने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, रोहिणी प्रवीण म्हस्के असे मृत विवाहितेचे नाव आहे. लग्नानंतर काही काळ तिचा संसार व्यवस्थित सुरू होता. मात्र मागील वर्षभरापासून पती प्रवीण म्हस्के, सासरे ब्रह्मानंद आनंदा म्हस्के, सासू विमल ब्रह्मानंद म्हस्के आणि दीर प्रदीप ब्रह्मानंद म्हस्के यांनी हुंडा कमी दिल्याचे सांगत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केल्याचा आरोप आहे. पतीच्या व्यवसायासाठी चारचाकी वाहन घेण्यासाठी आणखी 1 लाख रुपये आणावेत, अशी मागणी वारंवार केली जात होती.
सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली
मुलीच्या संसारात समेट व्हावा या हेतूने माहेरच्यांनी एकदा 10 हजार रुपये दिले होते. तरीही पैशांसाठी त्रास थांबला नाही, असे तक्रारीत नमूद आहे. 2 मार्च 2026 रोजी सततच्या त्रासाला कंटाळून रोहिणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेप्रकरणी परमेश्वर बाबासाहेब मोरे, वय 42 वर्षे, यांनी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.





