न्हावरे(ता. शिरूर): शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळे परिसरात शुक्रवारी(ता.03) सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. निष्काळजीपणे रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली असून, संबंधित ट्रक चालक ट्रकसह अपघातानंतर फरार झाला आहे.

शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे (ता. शिरूर) गावच्या हद्दीत मानकेश्वरी लॉन्ससमोर शिरूरकडे जाणाऱ्या लेनवर ट्रक (क्र. एम. एच-16, सी. सी- 9779) कोणतीही खबरदारी न घेता रस्त्यावर उभा करण्यात आला होता.ट्रक चालकाने कोणतेही रिफ्लेक्टर, इशारा चिन्ह किंवा सुरक्षेची साधने न लावता वाहन उभे ठेवल्याने महामार्गावर गंभीर धोका निर्माण झाला होता.

दरम्यान, कारेगाव (ता. शिरूर) येथे राहणारे सुर्यकांत अंगद सुर्यवंशी (वय 40) हे त्यांचा मित्र दिनेश राम यांच्यासह स्प्लेंडर दुचाकीवरून (क्र. एम. एच-24, बी. एन-7705) आलेगावकडून कारेगावकडे जात होते.यावेळी अंधारामुळे आंबळे (ता. शिरूर) येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने दुचाकीची ट्रकच्या पाठीमागील भागावर जोरदार धडक बसली.

या भीषण धडकेत दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित ट्रक चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून ट्रकसह पलायन केल्याची माहिती समोर पोलिस तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी मृत सुर्यकांत यांचे भाऊ चंद्रकांत अंगद सुर्यवंशी (वय 38, व्यवसाय–चालक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून,महामार्गावर निष्काळजीपणे वाहने उभी करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, फरार ट्रक चालकाचा शोध सुरू असून, पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.







