Pune News: पुणे: पुणे (Pune) शहरातील विमाननगर परिसरात सुरू झालेल्या द रामेश्वर कॅफेवर (The Rameshwar Cafe) पुणे महानगरपालिकेने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. दुकानासमोरील सार्वजनिक जागेचा अनधिकृत वापर केल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून स्थानिकांकडून केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने संबंधित ठिकाणी कारवाई करत कॅफेसमोरील बसण्याची व्यवस्था हटवली.

द रामेश्वर कॅफेची सुरुवात डिसेंबर 2025 मध्ये विमाननगर भागात झाली होती. बंगळुरू येथील ही प्रसिद्ध कॅफे असून पुण्यात शाखा सुरू झाल्यानंतर खाद्यप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळाला होता. दाक्षिणात्य पदार्थांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कॅफेमध्ये दररोज मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत होते. मात्र कॅफेकडून दुकानासमोरील फ्रंट मार्जिनचा वापर करून अतिरिक्त बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याची चर्चा होती.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक जागा अडवली जात असल्याची तक्रार महापालिकेकडे केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी करून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने कारवाई केली. कॅफेसमोर उभारण्यात आलेली तात्पुरती रचना काढून टाकण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 6500 चौरस फूट परिसरातील अनधिकृत बांधकामावर तोडफोड करण्यात आली आहे.
कॅफे सुरू होऊन अवघ्या 2 ते 3 महिन्यांतच ही कारवाई करण्यात आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. सार्वजनिक जागांचा वापर नियमांनुसारच व्हावा, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले आहे. महापालिकेकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.





