बीड: मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अशातच माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथे उपसरपंचावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लक्ष्मण चव्हाण या उपसरपंचावर लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओही समोर आला आहे, ज्यात आरोपी चव्हाण यांना मारहाण करताना दिसत आहेत.

ही धक्कादायक घटना ११ जुलै रोजी संध्याकाळी घडली. चव्हाण हे ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या काही चुकीच्या कामांवर आवाज उठवत होते. यामुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच महिलेच्या पतीने रागातून तीन-चार साथीदारांसह त्यांच्यावर हल्ला चढवला.
चव्हाण हे राष्ट्रीय महामार्ग २२२ वरून गावाकडे जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून गाडी अडवली. त्यानंतर चव्हाण यांना रस्त्यावरच लोखंडी रॉड, लाकडी दांडके यांनी बेदम मारहाण केली. एका आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र चव्हाण यांनी तो चुकवला. व्हिडीओत “डोक्यात मार, पायावर मार, डोक्यात दगड घाल” असे म्हणत आरोपी ओरडताना दिसत आहेत.
हल्ल्यादरम्यान आरोपी चव्हाण यांचे कपडे काढण्याचा प्रयत्न करत असल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. ही कृती संतोष देशमुख हत्येतील प्रकाराची आठवण करून देणारी आहे.
हल्ला पाहून काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. “डोक्यात मारू नका, काही वाईट होईल,” असे म्हणत काही लोकांनी मध्यस्थी केल्यावर आरोपी चव्हाण यांना सोडून निघून गेले. या हल्ल्यात चव्हाण यांच्या कानाचा पडदा फाटला असून, हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.







