बीड: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी राम खाडे (Ram Khade) यांच्या वर मांदगाव (बीड जिल्हा सीमेवर) येथे जीवघेणा हल्ला झाला. रविवारी रात्री ते (Sharad Pawar) अहिल्यानगर जिल्ह्यातून बीडकडे आपल्या सहकाऱ्यांसह कारने जात होते. प्रवासादरम्यान मांदगाव येथील एका हॉटेलमध्ये ते जेवण्यासाठी थांबले. जेवण झाल्यानंतर गाडीने पुढे निघताच, तोंडाला रुमाल बांधलेल्या सुमारे 10 ते 12 संशयितांनी त्यांच्या गाडीवर अचानक हल्ला चढवला. (Maharashtra Politics)

हल्लेखोरांच्या हातात सत्तूर, काठ्या आणि बंदुकीसारखी शस्त्रे होती. या संशयितांनी खाडे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि सर्वांवर बेदम मारहाण केली. मुख्य लक्ष्य मात्र राम खाडे हेच होते. मारहाणीमध्ये ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तात्काळ नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
या हल्ल्यानंतर गंभीर आरोप पुढे आले आहेत. राम खाडे यांचे सहकारी मनोज चौधरी यांनी हा हल्ला घडवून आणण्यामागे भाजप आमदार सुरेश धस यांचा हात असल्याचा आरोप केला. चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, सुरेश धस यांच्या भ्रष्टाचाराबाबत सत्य उघड केल्यामुळेच हा हल्ला घडवला गेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची CID आणि SIT मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. त्यांचे म्हणणे आहे की, निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम सुरेश धस यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा.
चौधरी यांनी असा आरोप केला की सुरेश धस घरात बसून हे सर्व प्लॅन करत आहेत आणि राजकीय षडयंत्र करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात जे लोक त्यांच्याविरोधात उभे राहतात, त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले घडवून आणले जातात, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे.







