बीड : बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जागेच्या वादातून मायलेकीसह तिघींवर लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे. या अमानुष मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तीन महिलांना रॉडने बेदम मारहाण केली जात आहे. या महिला वाचवण्यासाठी मोठ्याने ओरडताना दिसत आहेत. मात्र, तरीही या नराधमांना दया आली नाही. या मारहाणीत दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, मारहाण करण्यात आलेल्या तीन महिलांना गावातीच चार ते पाच पुरुषांनी रॉडने बेदम मारहाण केली आहे. घराचं बांधकाम सुरू असलेल्या जागेवरून हा वाद झाला आणि या वादानंतर तीन महिलांना मारहाण झाली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेने बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले असून, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.







