Ratnakar Gutte On Dhananjay Munde: गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. “धनूभाऊ, तुमचा इंदूरमध्ये मर्डर झाला असता, पण दिवंगत भय्यूजी महाराजांनी तुम्हाला वाचवले” या धक्कादायक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

Ratnakar Gutte काय म्हणाले?
गुट्टे यांनी थेट मुंडेंना उद्देशून म्हटले की, “तुम्ही इंदूरमध्ये कोणत्या हॉटेलवर होता, त्याची देखील मला माहिती आहे. तुमचा तिथे जीव गेला असता, पण भय्यूजी महाराजांनी तुम्हाला वेळीच वाचवलं.” आमदार गुट्टेंनी ‘हॉटेल’चा स्पष्ट उल्लेख करत, हा आरोप हवेत केलेला नसून आपल्याकडे ठोस माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराजांनी वेळेत हस्तक्षेप करून मुंडेंचा जीव वाचवल्याचा गुट्टेंचा दावा आहे.
हेही वाचा: पुण्यातील धक्कादायक प्रकार! EVM मशीनला हळद-कुंकू लावले, आरती केली अन्… नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
‘विजय मल्ल्या’ आणि राजकीय आव्हान
हा वाद आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांवरून सुरू झाला होता. मुंडेंनी गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावावर 1,600 कोटींचे कर्ज उचलल्याचा आरोप करत ‘महाराष्ट्राचे नीरव मोदी’ असे म्हटले होते. याला प्रत्युत्तर देताना गुट्टेंनी मुंडेंना ‘विजय मल्ल्या’ म्हणत पलटवार केला. “विजय मल्ल्याच्या आवडी आणि तुमच्या आवडीनिवडी एकच आहेत,” असे म्हणून त्यांनी मुंडेंच्या खासगी आयुष्यावरही निशाणा साधला.
गुट्टेंनी मुंडेंच्या राजकीय संघर्षाला थेट आव्हान देत म्हटले, “तुम्ही सुरुवात केली आहे, पण शेवट मी करणार आहे. तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली, हे मला माहीत आहे.”
हेही वाचा: आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रावर नियमांचे उल्लंघन, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
जनताच माझं बुलेटप्रूफ जॅकेट; आमदार गुट्टे
2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुंडेंनी आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करताना, गुट्टे यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली. “माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे. त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
गुट्टेंनी स्वतःला ‘राजा’ संबोधत मुंडेंना आव्हान दिले. “मी राजा आहे, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो,” असे म्हणत त्यांनी आपला राजकीय प्रभाव दाखवला आहे.
हा सर्व आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा गंगाखेड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरू झाला. त्यावेळी धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्याचा उल्लेख करत, गंगाखेडच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे सांगितले होते.
या गंभीर आरोपांवर आणि राजकीय संघर्षावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.






