छत्रपती संभाजीनगर: तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कौटुंबिक वादानंतर 18 वर्षीय कुणाल मुरलीधर चांदवडे याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचाही दरीत पडून मृत्यू झाला. या घटनेत कुणाल, त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे या तिघांचा मृत्यू झाला.

मुरलीधर चांदवडे हे ट्रकचालक म्हणून काम करत होते. कामानिमित्त त्यांना अनेकदा घरापासून दूर राहावे लागत होते. तब्बल 3 महिन्यांनंतर ते घरी परतले होते. त्यानंतर कुटुंबात पुन्हा वाद सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील 2 दिवसांपासून घरात सतत खटके उडत असल्याचेही सांगितले जाते.

कुणालला नवीन आयफोन घेण्याची इच्छा होती. वडिलांनी त्याला यापूर्वी आयफोन घेऊन दिला होता. मात्र, त्याला नवीन मॉडेल हवे होते. त्यातच जुन्या फोनचे हप्तेही बाकी असल्याची माहिती आहे. या आर्थिक आणि कौटुंबिक तणावातून कुणाल अस्वस्थ झाला होता.

या घटनेनंतर चांदवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुरलीधर यांना तीन बहिणी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भावंडांची भेट झाली नव्हती. यंदाच्या रक्षाबंधनाला भावाला राखी बांधण्यासाठी त्या भेटणार होत्या. मात्र, भावाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर बहिणीने आक्रोश करत, “दादा, मी कुणाला राखी बांधू आता?” असा सवाल केला आहे.
विशेष म्हणजे, मुरलीधर यांच्या एका मुलाचा सुमारे 6 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. दरम्यान, आता कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबातील वाद आणि आर्थिक तणाव किती गंभीर परिणाम घडवू शकतो, याची चर्चा सुरू आहे.







