Crime News: लातूर : लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. किरकोळ कौटुंबिक वादातून एका निर्दयी आईने आपल्या अवघ्या 18 महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पती घरी येण्यास उशीर झाला या कारणावरून निर्माण झालेल्या रागातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. (Latur Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, चौगुले कुटुंब मूळचे हासेगाव येथील असून रोजगारासाठी काही काळापूर्वी लातूरमध्ये वास्तव्यास आले होते. कुटुंबातील कर्ता पुरुष विक्रम चौगुले हे उसाच्या ट्रॅक्टरवर काम करून उदरनिर्वाह करत होते. कामाच्या स्वरूपामुळे त्यांना अनेकदा रात्री उशिरापर्यंत बाहेर राहावे लागत होते. 19 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घरात पती उपस्थित नसल्याने पत्नी अश्विनी चौगुले हिचा राग अनावर झाला.

या रागाच्या भरात अश्विनीने आपल्या लहान मुली नंदिनी हिच्यावर चाकूने वार केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. गंभीर जखमांमुळे चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी घरात असलेला 4 वर्षांचा मुलगा राजवीर याने हे सर्व दृश्य पाहिल्याची माहिती समोर आली असून, त्याच्यावरही या घटनेचा मोठा मानसिक परिणाम झाला आहे.

विक्रम चौगुले कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना घरात रक्ताचा सडा आणि मुलीचा निर्जीव देह दिसला. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी अश्विनी चौगुले हिला ताब्यात घेतले असून तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत ती मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे समजते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कौटुंबिक तणाव आणि रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.






