Pune Election 2026 : पुणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट वर्चस्व सिद्ध केलं असून, आकडेवारीतून शहराच्या राजकारणातील बदलती दिशा ठळकपणे समोर आली आहे. एकूण मतांच्या ४३.१२ टक्के वाट्यासह भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर विरोधकांची मते मोठ्या प्रमाणात विभागली गेल्याचा थेट फायदा भाजपला झाला आहे. (Pune Election 2026 )

या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे ‘नोटा’ला मिळालेली मते. तब्बल २.९६ टक्के मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला असून, ही टक्केवारी मनसे, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, एमआयएम आणि अपक्ष उमेदवारांपेक्षाही जास्त आहे. यामुळे शहरातील मतदारांमध्ये असलेली नाराजी आणि पर्यायांचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो.

राष्ट्रवादी काँग्रेसला २३.९३ टक्के मते मिळाली असून ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला ८.४८ टक्के मते मिळाली, तर शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नसली तरी ७ टक्के मते मिळाल्याने ती चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरली आहे. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांनाही अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही.

भाजपने शहरातील १८ प्रभागांमध्ये अक्षरशः क्लीन स्वीप केला. कोथरूड, खराडी-वाघोली, औंध-बोपोडी, कात्रज, धायरी, सहकारनगर, कोंढवा यांसारख्या भागांमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय हा संघटनात्मक ताकदीचा आणि प्रभावी प्रचाराचा परिणाम मानला जातो. मतांचे विभाजन इतकं निर्णायक ठरलं की काही प्रभागांमध्ये पराभूत उमेदवारांना मिळालेली मते ही विजयी मतांच्या अगदी जवळ होती.
या यशामागे नवमतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. २०१४ नंतर प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या मोठी असून, त्यातील सुमारे ८० टक्के मतदार भाजपकडे वळल्याचं चित्र आहे. विरोधी पक्षांना तरुण आणि नवमतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयश आल्याचं या निकालातून स्पष्ट होतं.
एकूणच, पुणे महापालिकेचा हा निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरता मर्यादित नसून, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी तो राजकीय पक्षांना महत्त्वाचे संकेत देणारा आहे. मतांचे विभाजन, वाढती ‘नोटा’ची टक्केवारी आणि भाजपची वाढती पकड—हे मुद्दे येत्या काळातील राजकारण ठरवणारे ठरणार आहेत.







