Crime News : छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील झांबड इस्टेट परिसरातील वसंत विहार सोसायटीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एका बंद घराला लक्ष्य करून चोरट्यांनी धाडसी चोरी (Theft) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदी असा मोठा मुद्देमाल लंपास केला. मात्र, शेजाऱ्यांनी दाखवलेल्या सर्तकेतमुळे चोरांची पळापळ झाली आणि चोरीला गेलेला काही मौल्यवान ऐवज पुन्हा मिळवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंत विहार सोसायटीत राहणारे विकास जगताप हे आपल्या कुटुंबासह १२ फेब्रुवारी रोजी कामानिमित्त पुणे येथे गेले होते. घर बंद असल्याचे पाहून १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दरम्यान, परिसरातील कुत्री जोरात भुंकू लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांना संशय आला. एका रहिवाशाने सतर्कता दाखवत तातडीने सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, दोन अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरताना दिसून आल्या.
शेजाऱ्यांनी तत्परतेने एकमेकांना गोळा केले आणि घराबाहेर धाव घेतली. नागरिक जमा झाल्याचे पाहून घरातून बाहेर पडणाऱ्या चोरट्यांची चांगलीच धांदल उडाली. चोरट्यांच्या हातात धारदार शस्त्रे असल्याने त्यांनी तेथून पळ काढला. मात्र, घाईघाईत पळताना चोरट्यांच्या हातातील एक पिशवी रस्त्यावरच पडली. या पिशवीमध्ये २.६२ किलो चांदी, सुमारे २० तोळे सोने आणि काही महागडी घड्याळे होती, जी नागरिकांमुळे सुरक्षित राहिली.
जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी त्यांच्या घरातून ३८.६ तोळे सोने, ४ लाख १७ हजार रुपये रोख आणि ३.५ किलो चांदी चोरून नेली होती. यातील मोठा हिस्सा शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे परत मिळाला आहे. घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शनिवारी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. नागरिक घराबाहेर जात असताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी आणि अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





