बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. प्रियंका खाकाळ (Priyanka Khakal) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव असून, तिच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रियंका यांचा विवाह १३ वर्षांपूर्वी बापू खाकाळ याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व सुरळीत असले तरी, सासरच्या मंडळींकडून घर बांधणीसाठी माहेरहून पैसे आणण्याची सतत मागणी होत होती. या मागण्यांना कंटाळून प्रियंका यांच्यावर मानसिक तणाव निर्माण झाला होता. अखेर या छळाला कंटाळून त्यांनी विषारी औषध घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात प्रियंका यांच्या सासरा, सासू, दीर आणि जाऊ या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, या घटनेनंतर संपूर्ण भागात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा अशाच प्रकारची हृदयद्रावक घटना समोर आल्यामुळे महिलांवरील सासरच्या छळाची गंभीरता अधोरेखित झाली आहे. अशा घटना रोखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता अधिक जोर धरत आहे.







