पुणे: यंदाच्या आषाढी वारीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांनी आपली पूर्वीची परंपरा मोडीत काढत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदा हे धारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य पालखी सोहळ्यात सहभागी होणार नाहीत, तर फक्त पालखीचे पुण्यात दर्शन घेऊन आपल्या गावी परतणार आहेत.

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर धारकऱ्यांनी पालखीचे दर्शन घेतले. यावेळी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम पुण्यात असून, या दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून धारकरी पुण्यात दाखल झाले होते.

धारकऱ्यांनी यंदा पालखीसोबत प्रत्यक्ष वारी न करता केवळ दर्शन घेण्याचा निर्णय घेतल्यामागे प्रवासाचा वेळ आणि परतीच्या प्रवासाची अडचण हे कारण सांगण्यात येत आहे. पालखीचे दर्शन घेतल्यानंतर वेळेत बस किंवा रेल्वेने गावी परतता यावे, यासाठी ही भूमिका घेतल्याचं सूत्रांकडून समजतं.

याआधीच्या वर्षी शिवप्रतिष्ठानचे धारकरी नंग्या तलवारी घेऊन वारीत सहभागी झाले होते. या प्रकारामुळे वारीच्या भक्तिमय आणि शांततेच्या वातावरणाला गालबोट लागल्याची भावना वारकरी संप्रदायात व्यक्त झाली होती. त्यानंतर पोलिस हस्तक्षेप आणि समाजमाध्यमांवरील टीकेचा भडका उडाला होता. त्यामुळे यंदा कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
शुक्रवारी संचेती हॉस्पिटलजवळ धारकऱ्यांनी संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी “राम कृष्ण हरी” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” चा जयघोष करत भाविक वातावरण निर्माण झाले. तसेच भिडे गुरुजींनी तुकोबांच्या पालखीचे सारथ्यही केल्याचे दृश्य पाहायला मिळाले. वारी ही भक्ती, शांती आणि समतेचे प्रतीक असते. त्यामुळे यंदा शांततेत दर्शन घेण्याच्या या निर्णयाचं अनेक स्तरातून स्वागत होत आहे.







