जालना: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जालना जिल्ह्यातील परतूर येथे (Ajit Pawar News) सभा घेतली. या सभेत भाषण करताना त्यांनी केलेल्या एका विधानामुळे अचानक वाद निर्माण झाला. भाषणात ते म्हणाले की, “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य केलं.” मात्र हे विधान चुकीचं असल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी लगेचच स्वतःची चूक मान्य करून जाहीरपणे माफी मागितली.

अजित पवार म्हणाले की, “थोड्या वेळापूर्वी बोलताना माझ्याकडून चूक झाली. मी चुकीने यशवंतराव चव्हाण यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं बोलून गेलो. मला याबद्दल माफ करा. हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती.” असे म्हणत त्यांनी आपल्या विधानातील चूक तत्काळ सुधारली.
यशवंतराव चव्हाणांबाबतचं ‘ते’ वक्तव्य; अजित पवारांनी भर सभेत माफी मागितली, पाहा व्हिडीओ pic.twitter.com/lwDRX9UfsG
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) November 22, 2025
Video Credit: @SumitBhujb19648
सभेत त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचीही आठवण करून दिली. ते म्हणाले की, “यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठे काम केले. विविध समाजघटकांना सोबत घेऊन राज्यकारभार मजबूत केला.” मात्र हिंदवी स्वराज्याचा उल्लेख चुकीचा असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्पष्ट केले की या ऐतिहासिक कार्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच आहे.
अजित पवार यांच्या या चुकीवर सोशल मीडियावर काहींची टीका झाली. परंतु चूक जाणवताच त्यांनी जाहीरपणे माफी मागून योग्य माहिती स्पष्ट केल्याने पुढील वाद टळला. निवडणूक प्रचाराच्या कालावधीत झालेल्या या घडामोडीमुळे सभेतील वातावरण क्षणभर बदलले असले, तरी त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सभा पुढे सुरू राहिली. अजित पवार यांनी शेवटी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रेरणास्थान आहेत आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना ही त्यांच्याच नेतृत्वाखाली घडलेली ऐतिहासिक घटना आहे.







