पुणे : पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मागील 8 दिवसांपासून रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाचा पट वाढला असतानाच, बुधवारी मध्यरात्री उपोषणाला बसलेल्या ऋषिकेश गांगुर्डे आणि गजानन शेळके या 2 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

आमदार रोहित पवार यांच्या सहभागामुळे या आंदोलनाला मोठे राजकीय व सामाजिक वलय प्राप्त झाले असून, राज्यभरातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी खासदारांनीही या आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. वाढता ताण पाहता, राज्य सरकारमधील काही प्रमुख मंत्री आज गुरुवारी दुपारी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची शक्यता असून, आज या गतिरोधावर सकारात्मक तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनाला विविध क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असतानाच काही ठिकाणी मतभेदही दिसून आले. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे कौतुक केले; मात्र त्यांनी ‘हे सर्वसामान्यांचे सरकार आहे’ असे विधान करताच संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांना तीव्र विरोध दर्शवला. दुसरीकडे, वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही रोहित पवार यांच्यावर टीका करत आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रोहित पवार हे विद्यार्थ्यांचा स्वतःच्या राजकारणासाठी वापर करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

दरम्यान, रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने उच्च न्यायालयाने आंदोलकांना वाहतुकीला अडथळा न आणण्याचे ताकीद दिले आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन राजकीय हेतूने हायजॅक करण्यात आल्याचा आरोप केला आहे.








