मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना कर्जफेडीच्या बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र कृषी कर्जखात्यांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी अधिक सवलत मिळू शकते.

राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC) महाराष्ट्राच्या विशेष बैठकीत यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. दुष्काळग्रस्त भागातील पात्र कर्जदारांची खाती निश्चित करून त्यानुसार कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया राबवण्यास बँकांना सांगण्यात आले आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना नवीन कर्ज किंवा गरजेनुसार अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि SLBC महाराष्ट्रचे अध्यक्ष तथा बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक प्रभात किरण यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत RBI कडून दिल्या जाणाऱ्या सवलती, कर्जखात्यांची पात्रता आणि पुनर्गठनाची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

केंद्र सरकारच्या वित्त सेवा विभागाचे सहसचिव आशिष मोरे यांनी बँकांनी पात्र कृषी कर्जाचे पुनर्गठन ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन बँकांनी तातडीने आणि संवेदनशीलपणे निर्णय घ्यावा, असे राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
बैठकीत RBI च्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही भर देण्यात आला. RBIचे प्रादेशिक संचालक सचिन शेंडे, पुनीत पंचोली, प्रवीण दराडे, परिमल सिंह, NABARDचे ए. व्ही. भवानीशंकर यांच्यासह SLBC आणि विविध जिल्ह्यांतील बँक अधिकारी उपस्थित होते.







