पुणे: राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. या निवडणुकीत काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची 50% ची कायदेशीर मर्यादा ओलांडली गेली आहे. या विषयावरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आज न्यायालय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण?
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर उडाला असताना, न्यायालयाने आरक्षणाच्या नियमात बदल करण्यास सांगितल्यास, सर्व प्रक्रिया पुन्हा कराव्या लागल्यास निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची भीती आहे.
आरक्षणाची मर्यादा ओलांडलेले जिल्हे
राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. नंदुरबारमध्ये 100%, पालघरमध्ये 93%, गडचिरोलीत 78%, नाशिकमध्ये 71% आणि धुळ्यात 73% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, अमरावती (66%), चंद्रपूर (63%), यवतमाळ (59%), अकोला (58%), नागपूर (57%), ठाणे (57%), गोंदिया (57%), वर्धा (54%) आणि जळगाव (54%) या जिल्ह्यांमध्येही आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे.







