रायगड : जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या ओळखीच्या काही तरुणांनी धमकावून तसेच फसवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत तिच्या घराचे बांधकाम करणाऱ्या ४० वर्षीय मिस्त्रीने घरात कोणी नसल्याची संधी साधून जबरदस्तीने प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(२)(ड), ३७६(२) तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील पाच आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, म्हसळा तालुक्यात यापूर्वीही अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना समोर आली होती. २३ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर महिन्याभरात पुन्हा अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे सपोनि चव्हाण करत आहेत. पोलिसांकडून घटनेतील सर्व बाबींचा तपास केला जात आहे.






