पुणे : सायबर चोरट्यांनी आता ज्येष्ठ नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने महत्त्वाचे कुरिअर पाठवल्याचे आमिष दाखवून, पुण्यात एका 82 वर्षीय निवृत्त प्राचार्यांची तब्बल 3,23,219 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सप्टेंबरच्या महिन्यात घडली.. चोरट्यांनी तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधून, “तुमच्या अमेरिकेतील मुलाने तुमच्यासाठी एक महत्त्वाचे पार्सल पाठवले आहे,” असे सांगितले. पार्सल मिळवण्यासाठी प्रक्रियेचा भाग म्हणून भामट्यांनी त्यांच्या दोन्ही मोबाईलमध्ये एक संशयास्पद ॲप डाऊनलोड करायला लावले.

ॲप डाऊनलोड होताच, चोरट्यांनी ज्येष्ठाला बँक खात्याची गोपनीय माहिती भरण्यास सांगितली. याशिवाय, मुलाच्या व्हॉट्सॲपवरून आल्यासारखे वाटणारे बनावट संदेश पाठवून त्यांनी तक्रारदाराचे दोन्ही मोबाईल फोन पूर्णपणे हॅक केले आणि त्यांचा रिमोट ॲक्सेस मिळवला. फोनचा ताबा मिळताच भामट्यांनी त्यांच्या खात्यातून 3 लाख 23 हजार 219 रुपये परस्पर लांबवले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निवृत्त प्राचार्यांनी तात्काळ कोंढवा पोलिसांत धाव घेतली. सध्या कोंढवा पोलीस आणि सायबर सेल या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून संशयितांचा शोध घेत आहेत.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या या डिजिटल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये अज्ञात ॲप डाऊनलोड करू नका, तसेच आपल्या बँक खात्याची आणि ओटीपीसारखी गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.






