पुणे : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि एका महिला नगरसेविकेविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले समाजमाध्यम प्रभावक संतोष गजानन पंडित यांची पुणे न्यायालयाने जामिनावर सुटका केली. जामीन मंजूर झाल्यानंतर पंडित यांना येरवडा कारागृहातून बाहेर सोडण्यात आले.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना पंडित यांनी संपूर्ण प्रकरण आपल्यासाठी मोठा धक्का असल्याचे सांगितले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपण आतापर्यंत मांडत आलेली भूमिका ही आपले संवैधानिक अधिकार वापरण्याचा भाग असल्याचे पंडित यांनी सांगितले. यापुढेही समाजातील विविध प्रश्नांवर प्रश्न उपस्थित करत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.

लोकशाही व्यवस्थेत जनता सर्वोच्च असते, त्यामुळे नागरिकांनी आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींना तसेच सत्तेत असलेल्या व्यक्तींना प्रश्न विचारले पाहिजेत, अशी भूमिका पंडित यांनी मांडली. संबंधित व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची असो, त्यांना प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपला उद्देश कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक टीका करण्याचा नव्हता, असेही पंडित यांनी स्पष्ट केले. आपल्या वक्तव्यामुळे कोणाला चुकीचे वाटले असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आपण मनापासून माफी मागत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, न्यायालयाने पंडित यांना जामीन देताना काही अटी घातल्या आहेत. त्यांना या प्रकरणातील फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधता येणार नाही. तसेच प्रकरणातील पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.







