बारामती, ता. 18 : काऱ्हाटी (ता. बारामती) गावात भरदिवसा एका युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. गावातील मुख्य चौकात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अमोल सदाशिव जाधव असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल जाधव याला गावातील मुख्य चौकात गाठून दोघांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर, हातावर तसेच शरीराच्या इतर भागांवर गंभीर वार झाल्याची माहिती आहे.हल्ल्यानंतर अमोल जाधव याला तातडीने उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, पोलिसांकडून या दिशेने तपास करण्यात येत आहे. हल्ल्यानंतर संशयित आरोपी ऋतिक आणि ओंकार फरार असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, बारामती तालुक्यातील विविध भागांत शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्याचे नेमके कारण, घटनेतील आरोपींची भूमिका आणि हल्ल्यामागील इतर कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. भरदिवसा गावच्या मुख्य चौकात झालेल्या या हल्ल्यामुळे काऱ्हाटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







