रायगड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एक वक्तव्य सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अलिबाग इथं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना कुणाला उगीच अंगावर घेऊ नका. असा सल्ला देत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

त्याचबरोबर ते म्हणाले की, ‘उगीच कुणाला अंगावर घेऊ नका पण अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्या.’ असा सल्ला देखील उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला.

नेमकं अजित पवार काय म्हणाले?

कुणी आरे केले तर त्याला कारे करा… पण कुणाला उगीच अंगावर घेऊ नका. मात्र कुणी अंगावर आलाच तर शिंगावर घ्यायला मागं पुढं पाहू नका.’ असा इशारा कार्यकर्त्यांना दिला. आम्ही कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी आमच्याही नादी लागू नये. हे सर्व करत असताना कायद्याची चौकट मोडू नका, असंही अजित पवार यांनी पुढे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं.







