मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने IPL 2026 च्या हंगामासाठी दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करताच क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. आधीच पहिल्या टप्प्यातील सामने निश्चित झाले होते, तर आता संपूर्ण स्पर्धेचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Cricket News)

या हंगामाची सुरुवात 28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनराईझर्स हैद्राबाद यांच्यातील सामन्याने बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 मार्च ते 12 एप्रिलदरम्यान 20 सामने खेळवले जाणार आहेत.
यानंतर दुसरा टप्पा 13 एप्रिलपासून सुरू होऊन 24 मेपर्यंत चालणार आहे. या टप्प्यात एकूण 50 सामने खेळवले जाणार असून, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि न्यू चंदीगडसह देशातील 12 शहरांमध्ये सामने होणार आहेत. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सनराईझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्याने होणार आहे.
या दोन्ही टप्प्यांनुसार एकूण 70 सामने होणार असून, त्यानंतर प्लेऑफ आणि अंतिम फेरीचे सामने आयोजित केले जातील. मात्र, सेमीफायनल आणि फायनलच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
पहिल्या टप्प्यातील काही महत्त्वाचे सामने म्हणजे मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (29 मार्च), चेन्नर सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (30 मार्च) आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (12 एप्रिल) हे सामने विशेष लक्षवेधी ठरणार आहेत.
एकूणच, पुढील दोन महिने देशभरात क्रिकेटचा जल्लोष पाहायला मिळणार असून, विविध शहरांमध्ये रंगणाऱ्या सामन्यांमुळे आयपीएल 2026 हा हंगाम चाहत्यांसाठी पुन्हा एकदा मोठा उत्सव ठरणार आहे.







