राहुलकुमार अवचट

यवत: ढोलताशांचा गजर, डी .जे चा नाद , आकर्षक विद्युत रोषणाई आकाशात फडकवणारे भगवी झेंडे, फटाकड्यांची आतिषबाजी, राम भक्तीत भारावलेले असंख्य भक्तगणांच्या साक्षीने निघालेली भव्य शोभायात्रा यामुळे यवत गाव राममय झाले होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पारंपारिक पद्धतीने दुपारी १२ वाजता श्रीरामाचा जयघोष झाला अन् ‘राम जन्मला गं सखी, राम जन्मला’, ‘सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय’. अशा भक्तिमय वातावरणात व जयघोषाने यवत येथील श्री विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली.
जन्मोत्सवानिमित्त विठ्ठल मंदिर, महालक्ष्मी मंदिर येथील श्रीरामाची मूर्ती, गाभारा, फुलांनी सजविण्यात आला होता. दरम्यान सकाळी श्री राम मूर्तीची अभिषेक पूजा करण्यात आली, सकाळी १० ते १२ भजन, रामजन्म , पाळणा , आरतीसह जन्मोत्सव आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले यावेळी दु.१२ वा. पुष्पवृष्टी करुन जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
श्री महालक्ष्मी मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेले श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन भाजपाच्या दौंड तालुका महिला अध्यक्ष शितल शेळके व महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. सायंकाळी सात वाजता समस्त ग्रामस्थ मंडळ यवत यांच्या वतीने श्री काळभैरवनाथ मंदिर पासून पालखी मार्गाने ढोल ताशांच्या गजर, डीजेचा नाद , फटाकड्यांची आतिषबाजी , आकर्षक विद्युत रोषणाईसह श्रीराम मूर्तीची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली यावेळी तरुण, महिलावर्ग व रामाभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.







