मुंबई: राज्यात अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, कॅन्टीन आणि फूड आउटलेट्सविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत आता मुंबईतील प्रसिद्ध ‘सूरज लामा मोमोज’च्या अंधेरी येथील मुख्य आउटलेटवरही कारवाई करण्यात आली आहे. FDA ने आठ फूड आउटलेट्सचे परवाने निलंबित केले असून, त्यामध्ये सूरज लामा मोमोजचाही समावेश आहे.

दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDA कडून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान संबंधित आठ आउटलेट्समध्ये अन्न हाताळणी, साठवणूक, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेसंदर्भातील नियमांमध्ये त्रुटी आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर नियमानुसार त्यांच्या परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

या कारवाईनंतर ‘सूरज लामा मोमोज’चे मालक सूरज लामा यांचा प्रवासही पुन्हा चर्चेत आला आहे. दार्जिलिंगमधील गाव सोडून वयाच्या १४व्या वर्षी रोजगारासाठी ते मुंबईत आले होते. सुरुवातीला छोटी-मोठी कामे केल्यानंतर त्यांनी सेलिब्रिटी ड्रायव्हर म्हणून काम केले. जवळपास २५ वर्षे त्यांनी या क्षेत्रात काम केले. सोनाक्षी सिन्हा, शाहिद कपूर यांच्यासारख्या कलाकारांसाठी तसेच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्ससाठीही त्यांनी चालक म्हणून काम केल्याचे सांगितले जाते.

२०१७ मध्ये सूरज लामा यांनी मोमोज विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ते सायकलवरून मोमोज विकत होते. पुढे ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरची नोकरी सोडून पूर्णवेळ व्यवसायाकडे लक्ष दिले आणि स्वतःचे दुकान सुरू केले.
त्यांच्या पत्नी विजयताही या व्यवसायात सहभागी झाल्या. त्यापूर्वी त्या गायक केके यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करत होत्या. सायकलवर मोमोज विकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे ‘सूरज लामा मोमोज’ या ओळखीपर्यंत पोहोचला. मात्र, आता अंधेरीतील मुख्य आउटलेटवर FDA ने केलेल्या कारवाईमुळे हा ब्रँड पुन्हा चर्चेत आला आहे.






