बेळगाव : गांजा, मोबाईल सापडणे आणि कैद्यांमधील हाणामारी अशा विविध घटनांमुळे चर्चेत असलेल्या बेळगावच्या हिंडलगा कारागृहातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने कैद्याकडून 40 हजार रुपये लाच स्वीकारून त्याच्याशी अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित घटना दोन वर्षांपूर्वीची असून, त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.

अर्धनग्न अवस्थेत खाकी वर्दीत व्हिडिओ कॉल
संबंधित महिला पोलीस अधिकारी दोन वर्षांपूर्वी हिंडलगा कारागृहात कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्या बंगळूर येथे सेवेत असल्याची माहिती आहे. आरोपानुसार, त्यांनी कारागृहातील कैद्यांना पैशांच्या मोबदल्यात घरचे जेवण उपलब्ध करून दिले. तसेच एका कैद्याकडून 40 हजार रुपये घेतल्यानंतर त्याच्याशी अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला असून, त्यामध्ये संबंधित महिला अधिकारी वर्दी बदलताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कारागृहातील अनेक कैदी संबंधित महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, भीतीमुळे अनेक कैदी तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचेही सांगण्यात आले आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कारागृहात अवैध प्रकार सुरू असल्याचा आरोप
सुरेश उर्फ साईकुमार या माजी कैद्याने लोकायुक्तांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. तो 2024 पर्यंत हिंडलगा कारागृहात होता. त्याने कारागृहातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. कारागृहातच अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा दावा त्याने केला असून, या प्रकारांचे व्हिडिओ आपल्याकडे असल्याचेही त्याने म्हटले आहे.
तुरुंगातील काही अधिकारी पैशांच्या मोबदल्यात कैद्यांना मोबाईल, सिमकार्ड, दारू आणि गांजा यांसारख्या वस्तू उपलब्ध करून देत असल्याचा आरोपही सुरेशने केला आहे. पैशांच्या जोरावर कैद्यांना कारागृहात विविध सुविधा मिळत असल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.
मोबाईल प्रकरणात खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप
कैद्यांची कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी कडक तपासणी होत असतानाही त्यांच्याकडे मोबाईल पोहोचतात, असा दावा सुरेशने केला आहे. काही अधिकारीच कैद्यांना मोबाईल विकत असल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यानंतर कैद्याच्या उशीखाली मोबाईल सापडल्याचे दाखवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
कारागृहातील भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करणाऱ्यांचे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाबले जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे. दोषी आढळलेल्या काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यानंतर पुन्हा सेवेत घेण्यात येत असल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.
सुरेशने यापूर्वीही हिंडलगा कारागृहातील कथित गैरप्रकारांचे काही व्हिडिओ समोर आणले होते. त्यानंतर आपल्याला अधिकाऱ्यांकडून धमक्या मिळाल्याचा आरोप त्याने केला आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर काही दिवसांतच कुणिगल पोलिसांनी त्याला अटक केल्याचेही त्याने म्हटले आहे.
दरम्यान, महिला पोलीस अधिकाऱ्याशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, संबंधित आरोपांची सत्यता आणि व्हिडिओमागील संपूर्ण वस्तुस्थिती अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.







