पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण बनले आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 31 ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. या काळात रात्रीच्या वेळी किमान तापमान घटल्यामुळे वातावरणात गारवा वाढेल. हवामानातील या बदलांमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत 31 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होऊ शकतो. तसेच पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही पावसाच्या सरी कोसळू शकतात. सोलापूर जिल्ह्यात मात्र हवामान कोरडे राहील. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून अहिल्यानगरमध्ये हलका पाऊस पडू शकतो. धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये पाऊस पडणार नाही.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याउलट मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांत पाऊस थांबणार असून वातावरण कोरडे राहील. दुसरीकडे विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 11 जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे तेथेही उघडीप राहून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.








