पुणे : पोलिसांच्या खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने आजाराचे कारण देऊन अधिकृत रजा घेतली आणि यादरम्यान थेट आंतरराज्यीय गांजा तस्करीत उडी घेतली. तेलंगणात 13 किलो गांजासह त्याला रंगेहात पकडण्यात आल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

नितीन ज्ञानू शिंदे असे या बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो पुण्याच्या विश्रामबाग वाहतूक विभागात कार्यरत होता. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शिंदे हा 7 ऑक्टोबर 2026 रोजी तब्येत बरी नसल्याचे सांगून रजेवर गेला होता. मात्र, या सुट्टीचा गैरवापर करून तो अमली पदार्थांच्या काळ्या बाजारात सक्रिय झाला होता.
तेलंगणातील वारंगल येथील नेक्कोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 ऑक्टोबर रोजी स्थानिक पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली. या कारवाईत नितीन शिंदे याच्याकडे तब्बल 12 किलो गांजा सापडला. पोलिसांनी त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या.

पोलिसासारख्या शिस्तप्रिय आणि संवेदनशील विभागात कार्यरत असताना असा गंभीर गुन्हा केल्यामुळे पुणे पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. पुणे शहर पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी याप्रकरणी तातडीने आदेश काढत नितीन शिंदे याला थेट सेवेतून बडतर्फ केले आहे.

खाकीच्या आड चालणाऱ्या अशा बेकायदेशीर धंद्यांमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या कडक कारवाईमुळे पोलीस दलातील इतर भ्रष्ट आणि गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक मोठा इशारा मिळाला असून, खात्यातील काळ्या माणसांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे.






