स्वारगेट : पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल 6 किलो 20 ग्रॅम गांजासह एकूण 4 लाख 26 हजार 305 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 28 ऑक्टोबर रोजी बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या पार्किंग परिसरात करण्यात आली.

आशिष रमेश शिंदे (वय 21 , रा. अप्पर, बिबवेवाडी) आणि अशितोष ऊर्फ स्वप्निल सोमनाथ कांबळे (वय 27 , रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्रीविरोधात कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे अधिकारी व कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. यावेळी स्वारगेट बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये दोघे संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला 6 किलो 20 ग्रॅम गांजा आढळून आला.

दरम्यान, या कारवाईत 3 लाख 1 हजार रुपये किमतीचा गांजा, 25 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि 115 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, पोलीस हवालदार योगेश कुंभार, संदिप देवकाते, सतीश चव्हाण, सुमित यादव, शरद धांडे, विनोद निंभोरे, प्रशांत कळसकर, म. पोलीस हवालदार सुरेखा साबळे, तसेच पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, देविदास वांढरे व दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने गेली आहे.






