यवत : पुणे-सोलापूर महामार्गावर लक्झरी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी (ता. 29) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास जाऊजीबुवा मंदिरासमोर घडली. अपघातानंतर जखमीला उपचारासाठी मदत न करता लक्झरी बसचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

समीर शंकर होले(वय -32, रा. सहजपुर होलेवस्ती ता. दौंड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत समीर यांचे चुलत भाऊ शुभम अविनाश होले (वय 27, रा. सहजपूर, होलेवस्ती) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर होले हे गुरुवारी रात्री शेतातील विहिरीवरील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी दुचाकीवरून होलेवाडीकडे जात होते. सहजपूर गावच्या हद्दीत पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ए.आर. 06 डी 0081 क्रमांकाच्या लक्झरी बसने त्यांच्या एम.एच. 61 सी 9761 क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघाताचा मोठा आवाज ऐकून शुभम होले घटनास्थळी धावले असता समीर हे रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसले. नातेवाइकांच्या मदतीने त्यांना रुग्णवाहिकेतून रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास यवत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डोक्याला, पोटाजवळील भागाला तसेच शरीराच्या इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, अपघातानंतर बसचालकाने वाहन घटनास्थळी उभे करून तेथून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात चालकाचा पोलिस शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे







