थेऊर : वाहतूक चलनाची बनावट APK फाईल मोबाईलमध्ये पाठवून एका व्यावसायिकाची तब्बल 6 लाख 98 हजार 999 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. कोलवडी (ता. हवेली) येथे 27 ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी प्रशांत सुनील मुरकुटे (वय 27, रा. मुरकुटे वस्ती, कोलवडी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्यांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत मुरकुटे यांचा वडकी-हडपसर परिसरात ‘शिवशंभो ट्रेडर्स’ नावाने बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय आहे. त्यांचे मांजरी खुर्द येथील आयडीबीआय बँकेत बचत खाते आहे. 15 ऑक्टोबर रोजी प्रशांत मुरकुटे हे मित्र शिवाजी काळुराम मोडक यांच्या चारचाकी वाहनातून तिरुमला ते कोल्हापूर असा प्रवास करीत होते.

प्रवासादरम्यान कर्नाटकातील देवानहल्ली येथे मुक्कामी असताना मित्राला चलनाचा मेसेज आल्याचे समजले. मित्राने तो मेसेज आणि त्यातील लिंक प्रशांत यांना एसएमएसद्वारे पाठवली. त्यांनी लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये APK फाईल डाउनलोड झाली. ती उघडल्यानंतर ‘एमपरिवहन’ नावाचे अॅप डाउनलोड झाले.

अॅपमध्ये मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी एक रुपयाची मागणी करण्यात आली. त्यामुळे त्यांनी अॅप डिलीट केले; मात्र APK फाईल डिलीट करायची राहून गेली. 27 ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास ते कोलवडी येथील घराजवळील राज मेडिकलजवळ उभे असताना त्यांच्या मोबाईलवर सलग सहा ओटीपी आले. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत 50 ते 60 ओटीपी मेसेज आले. लगेचच खात्यातून 99 हजार आणि एक लाख रुपये डेबिट झाल्याचे संदेश मिळाले. मोबाईल हँग झाल्याचा संशय आल्याने त्यांनी मोबाईल बंद केला.
दरम्यान, त्यानंतर त्यांनी सायबर गुन्ह्यांसाठीच्या 1930 हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार नोंदवली. भावाच्या मोबाईलवरून नेट बँकिंग तपासले असता आणखी पाच व्यवहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पुन्हा हेल्पलाइनवर संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मोबाईलमध्ये डाउनलोड झालेल्या APK फाईलच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी मोबाईलचा रिमोट अॅक्सेस मिळवून बँक खात्यातील रक्कम परस्पर काढल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी त्यांनी 27 ऑक्टोबर रोजी सायबर पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवली. आयडीबीआय बँकेतील खात्यातून सात व्यवहारांद्वारे एकूण 6 लाख 98 हजार 999 रुपये काढण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.






