मुंबई : नवी मुंबईत पत्रकारितेचा बनाव करून व्यावसायिकांना धमकावणारा आणि खंडणी वसूल करणारा सरावलेला गुन्हेगार सचिन मनोहर कदम याला रबाळे पोलिसांनी मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. तो गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार होता. त्याच्यावर खंडणीसह विनयभंगाचा गुन्हाही दाखल आहे.

रबाळे, घणसोली आणि संपूर्ण नवी मुंबई परिसरात हा भूरटा गुंड स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत असे. बिल्डर्स आणि इतर व्यावसायिकांना तो सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून बदनामीकारक बातम्या छापण्याची धमकी देत होता. बांधकाम व्यावसायिक कनैयासिंग यांच्याकडे अशाच प्रकारे खंडणी उकळण्याचा त्याचा प्लॅन होता. कनैयासिंग यांच्याविरोधात उपोषण करण्याचे नाटक करून त्यांना मानसिक त्रास देण्यात आला आणि पैशांसाठी दबाव टाकला गेला. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यापूर्वी पोलिसांनी त्याच्या भगवानसिंग ठाकूर आणि सुरेश मंगरूळकर या दोन साथीदारांना अटक केली होती. मंगरूळकरवर तर तडीपारीची कारवाईदेखील झाली होती, पण सचिन कदम मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
केवळ खंडणीच नव्हे, तर सचिनच्या विरोधात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला होता. राहत्या घरी एका महिलेसोबत असभ्य वर्तन केल्यामुळे त्याच्यावर कलम 59/2025अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातही तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. सतत दोन वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी लपत छपत फिरणाऱ्या सचिनचा माग काढण्यात रबाळे पोलिसांना अखेर यश आले. 30 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री पोलिसांनी एका फिल्मी स्टाईल सापळ्यात त्याला मुंबईतून शिताफीने अटक केली.

अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रबाळे पोलीस करत आहेत. पत्रकाराच्या नावाखाली बळाचा वापर करून खंडणी उकळणाऱ्या अशा समाजकंटकांना पोलिसांनी मोठा दणका दिला आहे.

पत्रकारितेचा किंवा आरटीआयचा गैरवापर करून कोणी धमकावत असल्यास किंवा पैशांची मागणी करत असल्यास घाबरून न जाता थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी केले आहे..







