मुंबई : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आली आहे. पीडित कुटुंबातील राम पूर्णेकर यांनी ठाण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी बंद दाराआड सविस्तर चर्चा केली. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी पूर्णेकर कुटुंबीयांना दिलासा देत स्पष्ट केले की, या हत्येप्रकरणी योग्य न्याय दिला जाईल आणि सरकार कोणत्याही दोषीला किंवा आरोपीला पाठीशी घालणार नाही.

राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना तपासाच्या सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. या प्रकरणात आतापर्यंत विशेष तपास पथक (SIT), खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत 5 आरोपींना गजाआड केले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
मात्र, कापूरबावडी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या पुरवणी जबाबात शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे मुख्य आरोपी म्हणून समोर आली आहेत. असे असूनही एसआयटीकडून अद्याप त्यांना अटक का करण्यात आलेली नाही, असा थेट सवाल राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. यामुळे बैठकीतील वातावरण अधिक गंभीर बनले होते.

कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले. कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासन दोषींवर कडक कारवाई करेल, असा विश्वास त्यांनी दिला. या महत्त्वाच्या भेटीनंतर आता पोलीस यंत्रणा पुढील काय पावले उचलणार आणि शिंदे दांपत्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







