पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. 1 नोव्हेंबरपासून 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांना PMPML च्या बस तिकिटामध्ये थेट 50 टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि PMRDA च्या संपूर्ण कार्यक्षेत्रात चालणाऱ्या सर्व बस मार्गांवर लागू असेल.

यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना केवळ 70 रुपयांच्या दैनिक पासवर 50 टक्के सवलत मिळून तो 35 रुपयांत उपलब्ध होत होता. परंतु नवीन निर्णयामुळे आता रोजचा पास न काढता थेट तिकिटावरही अर्ध्या दराचा फायदा घेता येईल. त्यामुळे औषधोपचार, बाजारहाट किंवा नातेवाईकांकडे जाण्यासाठी नियमित प्रवास करणाऱ्या वृद्धांचे पैसे वाचण्यास मदत होईल. महागाईच्या काळात सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा आणि ज्येष्ठांचा प्रवास सुलभ व्हावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
प्रवाशांनी बसमधील प्रवासादरम्यान वयाचा अधिकृत पुरावा सोबत ठेवणे अनिवार्य आहे.तसेच 60 वर्षे पूर्ण झाल्याचे सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा PMPML चे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र दाखवावे लागेल.आधार कार्ड वापरणार असल्यास त्यावर संपूर्ण जन्मतारीख (दिनांक, महिना आणि वर्ष) नमूद असणे आवश्यक आहे. फक्त जन्मवर्ष असलेले आधार कार्ड सवलतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

शहर आणि उपनगरातील हजारो प्रवाशांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. PMPML प्रशासनाने सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना या अर्ध्या दराच्या तिकीट सवलतीचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.








