
नाशिक: जादूटोणा केल्याच्या संशयातून दोन तरुणांनी एका ४० वर्षीय व्यक्तीचा विटांनी ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे फुलेनगर भागात घडली. मृत व्यक्तीचे नाव संजय तुळशीराम सासे (वय ४०, रा. महाराणा प्रताप नगर, पेठ रोड) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल क्षीरसागर आणि धीरज सकट या दोघांनी फुलेनगरमधील मनपा शाळा क्र. ५६ च्या मागे, प्रवीण किराणा दुकानाजवळ संजय सासे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर गंभीर इजा होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, रविवारी सायंकाळपासून हे तिघे एकत्र होते.

विशाल क्षीरसागर याचा भाऊ प्रमोद क्षीरसागर याचा मृत्यू आठ महिन्यांपूर्वी झाला होता. सासे यांनी काहीतरी जडीबुटी खाऊ घातली आणि त्यामुळेच त्याच्या भावाचा मृत्यू झाला, असा त्याचा समज होता. त्यासोबतच सासे यांनी जादूटोणा आणि अघोरी कृत्ये केली असावीत, असा संशयही असल्याचं त्याने पोलिसांना चौकशीवेळी सांगितलं आहे.त्यामुळेच त्याने संजय सासेवर राग धरूनत्याचा खून केल्याचं तपासात समोर आले आहे. संजय सासे हे ‘जादूटोणा’ करत असल्याचा संशय होता, अशी माहिती स्थानिकांनी देखील दिली आहे.या प्रकरणी संजय सासे यांची पत्नी रूपाली सासे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे.
ही घटना घडल्यापासून परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अशा अंधश्रद्धेवर आधारित हिंसाचारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.सध्या नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्थेचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. नागरिकांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची मागणी केली आहे.







