कोलकाता: ईडन गार्डन्सच्या मैदानावर क्रिकेट चाहत्यांना (T20 World Cup) कल्पनेपलीकडची फटकेबाजी पाहायला मिळाली. टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा केवळ पराभवच केला नाही, तर त्यांचा आत्मविश्वास अक्षरशः चिरडून टाकला. फिन ॲलन नावाच्या वादळाने ईडन गार्डन्सवर असं काही थैमान घातलं की, 170 धावांचं आव्हान न्यूझीलंडने अवघ्या 77 चेंडूत पूर्ण करून फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.
या सामन्याचा खरा हिरो ठरला तो म्हणजे सलामीवीर फिन ॲलन. त्याने केवळ 33 चेंडूंत शतक झळकावून टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे, त्याच्या संपूर्ण खेळीत त्याने फक्त ४ डॉट बॉल खेळले. 8 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने त्याने जलद रन बनवले. ॲलनला टीम सायफर्टने (58 धावा) उत्तम साथ दिली, ज्यामुळे सुरुवातीलाच फक्त 1 विकेट गमावून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला.
न्यूझीलंडचा विजय केवळ बॅटिंगवर अवलंबून नव्हता. टॉस जिंकून कर्णधार मिचेल सॅन्टनरने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला. दरम्यान, गुरूवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात जी टीम जिंकणार ती टीम न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये खेळणार आहे.






