Ind Vs Pak T-20 World Cup: भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली सुरू असलेल्या 2026 टी-20 विश्वचषकात आतापर्यंत सहा सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात अमेरिकेवर मात करत विजयी सुरुवात केली आहे. मात्र, स्पर्धेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा सामना 15 फेब्रुवारी रोजी होणारा भारत-पाकिस्तान लढत ठरणार आहे.

दरम्यान, या सामन्याबाबत पाकिस्तान सरकारने बहिष्काराचा निर्णय जाहीर केल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काही वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार पाकिस्तान आपल्या भूमिकेत बदल करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर 8 फेब्रुवारी रोजी आयसीसी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या या बैठकीत बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलुबल, आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी उपस्थित होते. मात्र, या चर्चेत कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नसल्याचे समजते. पीसीबीचे अध्यक्ष नक्वी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, भारताविरुद्धच्या सामन्यावरील बहिष्कार मागे घेण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीसमोर तीन प्रमुख अटी ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महसुलात वाढ, भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट मालिका पुन्हा सुरू करणे आणि टी-20 विश्वचषकादरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करावे, अशा मागण्यांचा समावेश आहे.
मात्र, पीसीबीची दुसरी अट भारत स्वीकारण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे मानले जाते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर राजकीय तणावामुळे गेल्या 16 वर्षांत दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने आले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी हस्तांदोलन करण्याची परंपरा थांबवली आहे. आशिया कप 2025 पासून भारतीय खेळाडू सामन्यांदरम्यान पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाहीत, असा निर्णयही घेतला गेला आहे.
दरम्यान, पीसीबीमधील काही अधिकारी 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारताविरुद्ध सामना खेळण्यास तयार असल्याचे संकेत देत असले, तरी बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी या मुद्द्यावर सहकार्य करत नसल्याचे सांगितले जाते. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नक्वी सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेऊन पुढील सल्लामसलत करणार असल्याची माहिती आहे.






