आदित्य बोराटे

डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भगर आणि साबुदाणा पिठाची भाकरी खाल्ल्याने चार महिलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या सर्व महिलांवर सध्या उपचार सुरू आहेत.
नवरात्रीच्या उपवासासाठी गावांतील काही महिलांनी सोमवारी संध्याकाळी भगर पीठ विकत घेतले आणि त्यापासून भाकरी तयार करून खाल्ली. काही तासांनंतर त्यांना उलट्या, पोटदुखी, चक्कर आणि मळमळ अशी लक्षणे जाणवू लागली. त्यांना तातडीने डोर्लेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन महिलांना पुढील उपचारांसाठी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे, तर उर्वरित दोघींवर डोर्लेवाडीतच उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने गावात जाऊन तपास सुरू केला. संबंधित भगर पिठाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच, या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) तातडीने कारवाई करत किराणा मालाची तपासणी सुरू केली असून, भगर आणि साबुदाणा पिठाची विक्री थांबवली आहे. त्यांनी परिसरातील नागरिकांना सध्या भगर आणि साबुदाणा पिठाची भाकरी खाऊ नये, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, नवरात्रीच्या काळात अशा पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्यामुळे, अन्नधान्य विक्रेत्यांना स्वच्छतेची आणि गुणवत्तेची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागानेही नागरिकांना उपवासाचे पदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता तपासूनच वापरण्याचे आवाहन केले आहे.
नवरात्र उपवासमध्ये उपवास धरणारे नागरिक साबुदाणा खिचडी बरोबरच, भगर व साबुदाणा पिठाची भाकरी खात असतात मात्र नागरिकांनी साबुदाणा पीठ व भागरीचे पीठ यापासून केलेली भाकरी खाऊ नये असे आवाहन बी एम ठाकूर – अन्न व औषधं सहाय्यक आयुक्त अन्न औषधं प्रशासन पुणे जिल्हा यांनी केले आहे.







