लोणी काळभोर: थेऊर (ता.हवेली) येथून एक महिला मागील तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह थेऊर परिसरातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत शुक्रवारी (ता.14) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विमल महादेव सावंत ( वय 59, रा. चव्हाण वस्ती थेऊर ता. हवेली जिल्हा पुणे) असे मृतदेह आढळलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमल सावंत या 11 फेब्रुवारीला घरातून निघून गेल्या होत्या. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच विमल सावंत या मनोरुग्ण असल्याचीही माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना काकडे वस्ती येथील शेतकरी संतोष काकडे यांच्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगत आहे, अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलिस हवालदार विजय जाधव, चंद्रकांत माने, प्रशांत सुतार, पोलिस मित्र संतोष गायकवाड, संतोष ओव्हाळ हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विमल सावंत यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजणार आहे. तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश करे करीत आहे.







