Vitthal Mandir : जर्मनीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणार आहे. ख्रिसचेम येथील श्री विठ्ठलधाम मंदिरात हा सोहळा पार पडणार असून, आळंदी आणि देहू येथून संस्थानचे विश्वस्त आणि वारकरी या कार्यक्रमासाठी जर्मनीला रवाना झाले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंती वर्ष आणि संत तुकाराम महाराजांच्या 450 व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. 19 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत कीर्तनकार डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांचे इंग्रजीतून कीर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 12.30 दरम्यान मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
या सोहळ्यासाठी भजन, कीर्तन आणि प्रवचन अशा कार्यक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. संतांच्या विचारांचा आणि साहित्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने दिली आहे.







