Pune : अक्षय तृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कुंभारवाडा परिसरात मातीच्या घागरी आणि कराकिळी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग दिसून येत आहे.

अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी घरोघरी पूर्वजांच्या स्मरणार्थ पूजाविधी केले जातात. घागर भरून पूजन करणे, तर्पण विधी करणे यासाठी मातीच्या घागरी आणि त्यावर ठेवण्यात येणाऱ्या करा-किळीचा वापर केला जातो. त्यामुळे सणानिमित्त प्रत्येक घरात नवीन घागर खरेदी करण्याची प्रथा आहे.
या पार्श्वभूमीवर कुंभार समाज मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने घागरी आणि कराकिळी तयार करत आहे. बाजारात विविध आकारातील घागरी आणि करा-किळी उपलब्ध असून ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. यंदा कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने दरात सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. कराकिळीचा दर प्रति नग 30 रुपये असून दोन नगांसाठी 50 रुपये आकारले जात आहेत. शेकडा दर 1300 ते 1500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी 1000 ते 1100 रुपये होता.
बाजारात करा आणि किळी असे दोन प्रकार उपलब्ध आहेत. लाल रंगाचा ‘करा’ पुरुषांच्या पूजेसाठी, तर काळ्या रंगाचा ‘किळी’ महिलांच्या पूजेसाठी वापरला जातो. कुंभारवाड्यात हे साहित्य होलसेल दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांची खरेदी वाढली आहे. व्यावसायिक योगेश जामदार यांनी मागणी वाढल्याचे सांगितले आहे.






