पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालयाला जोडणारा भुयारी मार्ग गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. हा भुयारी मार्ग तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी पुणे बार असोसिएशन या वकिलांच्या शिखर संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन सादर करण्यात आले.

या वेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड, सचिव ॲड. पृथ्वीराज थोरात, तसेच महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष ॲड. निलेश निकम उपस्थित होते. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील भुयारी मार्ग लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.
महापालिकेच्या २०१०-११ च्या अंदाजपत्रकात तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष ॲड. निलेश निकम यांनी या भुयारी मार्गासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार २०१८ मध्ये या मार्गाचे उद्घाटन झाले. काही काळ हा मार्ग वकिलांसह पक्षकारांसाठी खुला होता आणि दोन्ही न्यायालयांमधील ये-जा सुलभ झाली होती.

मात्र, २०२१ पासून मेट्रोच्या कामामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. सध्या शिवाजीनगर न्यायालयातील प्रवेशद्वार क्रमांक चारजवळून वळसा घालून पक्षकारांना कौटुंबिक न्यायालयात जावे लागते, असे ॲड. हेमंत झंजाड यांनी सांगितले. त्यामुळे कामकाजात अडथळा निर्माण होत असून, हा मार्ग त्वरित सुरू करण्याची गरज असल्याचे मत वकिलांनी व्यक्त केले आहे.







