मुखी हरिनामाचे नाव व टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सायंकाळी ७ च्या सुमारास वरंवड येथे विसावला. यवत ते वरवंड हे अंतर अवघे १४ कि.मी. असल्याने अनेक वारकऱ्यांनी भांडगाव येथे पहिल्या विश्रांती वेळी अधिक काळ भजन, हरिनामाच्या जयघोषणात घालवला दुपार नंतर पालखी सोहळा वरवंड कडे मार्गस्थ झाला दुसऱ्या विश्रांतीसाठी पालखी सोहळा चौफुला येथे थांबला यावेळी दौंड तालुक्यासह शिरूर, बारामती तालुक्यातील अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला तर यवतचा मुक्काम आटोपून सकाळपासूनच अनेक वारकरी हळूहळू वरवंड गावात दाखल झाले होते.

विठूरायाच्या जयघोषात श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वरवंड नगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले पालखी सोहळ्याचा स्वागतसाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून गर्दी केली होती. पालखी स्वागतासाठी मोठ्या कमानी तर ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर व पालखी मार्गावर आकर्षक रांगोळीचा पायघड्या होत्या. पालखी नवीन विठ्ठल मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर विठ्ठल नामाच्या जयघोषात करण्यात आला पालखी आगमनानंतर वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून नवीन विठ्ठल मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. परिसरात व पालखी मार्गावर स्वच्छतेचे संदेश,निर्मल वारी संदेश, झाडे लावा, झाडे वाचवा असे फलक लावण्यात आले होते.







