लोणी काळभोर : अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या पुणे विभागस्तरीय जलतरण व वॉटरपोलो क्रीडा स्पर्धेत सुहानी कमलेश काळभोर व ख्यात बाहेकर यांनी ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 15 ऑक्टोबर रोजी लातूर या ठिकाणी होणाऱ्या ब्रेस्टस्ट्रोक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या दोघांची निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय जलतरण व वॉटरपोलो क्रीडा स्पर्धेचे आयोजन सैनिकी स्कूल लोणी, ता. राहता जिल्हा अहिल्यानगर येथे सोमवारी (ता. 06) करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत लोणी काळभोर येथील एमआयटी सीबीएससी या संस्थेतील पाच विद्यार्थी जिल्हा स्पर्धा जिंकून पात्र झाले होते. सदर स्पर्धेमध्ये इयत्ता दहावीतील सुहानी कमलेश काळभोर हिने 19 वर्ष वयोगटाखालील स्पर्धेतील 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारात द्वितीय क्रमांक व अकरावी कॉमर्स मध्ये शिकणाऱ्या ख्यात बाहेकर या विद्यार्थ्याने 19 वर्षाखालील गटात 200 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त करत राज्य स्पर्धेसाठी पात्रता गाठली आहे.
दरम्यान, विजेत्या खेळाडूंना एमआयटीचे संचालक पद्माकर फड सर, जलतरण विभागाचे प्रमुख प्रकाश सर, प्रशिक्षक सिद्धार्थ सर निवास साळुंखे व प्राचार्या अरूणा अँटणी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले.







