विशाल शिंदे

पुणे: जागतिक सर्प दिनानिमित्त पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्प रक्षक असोसिएशनतर्फे नसरापूर येथे सर्प जनजागृती कार्यशाळा झाली. शेकडो शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ, सर्पमित्र सहभागी झाले. सर्पांविषयी भीती, अंधश्रद्धा दूर करत शास्त्रीय माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रातील चार विषारी साप नाग, मण्यार, घोणस, फुरसा व त्यांच्या चावल्याने शरीरावर होणारे परिणाम समजावून सांगितले. नाग-मण्यारांचे विष मज्जासंस्थेला, तर घोणस-फुरशाचे विष रक्ताला हानी पोहोचवते. चावल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन प्रतिविष घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.
मांडूळ, धामण, डोहसाप यांसारखे बिनविषारी साप उपयुक्त असूनही अंधश्रद्धेमुळे मारले जातात. धामण उंदीर खातो व पिकांचे रक्षण करतो, म्हणून तो शेतकऱ्यांचा मित्र आहे, हे समजावले गेले.
साप निसर्गातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असून उंदरांचे प्रमाण कमी ठेवतो. त्याच्या विषाचा औषधनिर्मितीत वापर होतो. त्यामुळे “साप मारू नका, वाचवा” हा संदेश देण्यात आला.
सर्पमित्र जीव धोक्यात घालून साप पकडतात व जंगलात सोडतात. तरी शासनाकडून त्यांना ओळखपत्र, विमा, आरोग्य सुविधा दिल्या जात नाहीत. साताऱ्यात ओळखपत्रे वाटली गेली, मात्र पुण्यात मागणी प्रलंबित आहे.
अध्यक्ष सुशील विभुते म्हणाले, “सर्प निसर्गासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांना मारू नका. सर्पमित्रांना सन्मान द्या.”
सर्पदंश टाळण्यासाठी काळजी घ्यावी, व चावल्यास झोपवून हालचाल कमी करून तात्काळ रुग्णालयात न्यावे.







