न्हावरे : मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या दोन इसमांवर शिरूर पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत.

मांडवगण फराटा येथील पहिल्या प्रकरणात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब टेंगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (ता.१३) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा गावातील राजमुद्रा हॉटेलच्या बाजूला असलेल्या पत्राशेडच्या आडोशाला आरोपी स्वप्निल दगडू भंडलकर (वय २८,रा. मांडवगण फराटा,ता.शिरूर,जि.पुणे) हा खाकी रंगाच्या बॉक्समध्ये एकूण २२२० रुपये किमतीची देशी आणि विदेशी दारू परवानगीशिवाय विक्री करताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी स्वप्निल भांडलकर याच्याकडून टँगो पंच कंपनीच्या १८० मि.ली.च्या २४ सीलबंद बाटल्या तसेच मॅकडोनल नंबर वन रम कंपनीच्या १८० मि.ली. च्या ४ सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत.
दुसऱ्या घटनेत, पोलीस हवालदार एन.पी सुद्रिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मांडवगण फराटा येथील रानजत्रा हॉटेलच्या मागील बाजूस आरोपी भाऊसाहेब बबन टोणगे (वय ४९,रा.मांडवगण फराटा,ता.शिरूर, जि.पुणे) याच्याकडून ३ हजार ६० रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. यावेळी पोलिसांनी टोणगे याच्याकडून संत्रा देशी दारूच्या १८० मि.ली.च्या ४८ बाटल्या जप्त केल्या आहेत.

या प्रकरणात आरोपींच्या विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून, वरील दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, शिरूर पोलिसांनी अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी केलेली कारवाई स्थानिक पातळीवर कौतुकास्पद ठरत आहे.







